पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आप’चा शंखनाद; रविराज काळे यांच्या ‘आप लढणार, बदल घडणार’ मोहिमेला प्रतिसाद

👁️ 603 Views

पिंपरी-चिंचवड : भ्रष्टाचार, गुंडगिरी, भांडवलशाही आणि घराणेशाहीच्या राजकारणाला थेट आव्हान देत आम आदमी पक्षाने (आप) पिंपरी-चिंचवडमध्ये आपली राजकीय 8उपस्थिती अधिक ठळक केली आहे. शहराध्यक्ष रविराज बबनराव काळे यांच्या नेतृत्वाखाली ‘आप लढणार, बदल घडणार’ या घोषणेसह सुरू झालेल्या जनसंवाद मोहिमेमुळे शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

प्रभाग क्रमांक २६ (पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, विशाल नगर, वाकड) येथे नागरिकांशी थेट संवाद साधत काळे यांनी पक्षाच्या गॅरंटींवर भर दिला. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली मोफत वीज, पाणी, दर्जेदार शिक्षण व आरोग्यसेवेच्या योजनांमुळे सामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारने शेतकरी व तरुणांसाठी घेतलेल्या ठोस निर्णयांचा उल्लेख करत, हाच विकासाचा मॉडेल पिंपरी-चिंचवडमध्ये राबवण्याचा ‘आप’चा निर्धार असल्याचे स्पष्ट केले.

“भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित प्रशासन हेच आमचे अंतिम ध्येय आहे,” असे सांगत काळे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले. महिलांसाठी मोफत बससेवा, मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण, सर्वांसाठी आरोग्यसेवा, घरपोच सरकारी योजना, कचरामुक्त व ट्रॅफिकमुक्त शहर, तसेच २० हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती आणि प्रत्येक कुटुंबाला मोफत पाणीपुरवठा या ‘आप’च्या प्रमुख गॅरंटींविषयी त्यांनी माहिती दिली.

वाढती ट्रॅफिक कोंडी, कचरा व्यवस्थापन आणि बेरोजगारीसारख्या स्थानिक प्रश्नांवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना केल्या जातील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. या जनसंवाद मोहिमेला विशेषतः तरुण व महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, पक्षात नव्या सदस्यांची भर पडत आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ची वाढती ताकद पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात बदलाची नांदी ठरत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.