पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांचे आज बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघालेल्या विमानाचे लँडिंग होताना अपघात झाला, ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “अजितदादा… तुमच्याबद्दल असं काही व्यक्त होण्याची वेळ यावी, हे दुर्दैवच! माझ्यासाठीच नव्हे, तर तुमचं हे असं अकाली निघून जाणं सगळ्या महाराष्ट्रासाठीही दुर्दैवच.” पाटील यांनी अजितदादांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. “एक राजकारणी म्हणून अजित पवार यांचा प्रवास खूप वर्षांपासून पाहिलाय. महायुती सरकारमध्ये त्यांचा पक्ष आला, त्यामुळे त्यांना जवळून अनुभवता आलं. त्यांचा कामाचा झपाटा, निर्णय घेण्याची हातोटी, प्रत्येक विषयातील अभ्यास आणि प्रशासनावरील पकड विलक्षण होती,” असे ते म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले, “अजितदादा फक्त राजकारणी नव्हते, तर एक माणूस म्हणूनही जवळून पाहता आले. कठोर निर्णय घेताना ते डगमगले नाहीत. चुकीच्या वागणुकीला खडेबोल सुनावतानाही त्यांचा मिश्कील स्वभाव दिसायचा. एखाद्याला चार शब्द सुनावताना ते असं काही बोलायचे की, ऐकणारा हसायचा.”
अजितदादांच्या बारामतीवरील प्रेमाचा उल्लेख करत पाटील म्हणाले, “बारामती त्यांची जन्म-कर्मभूमी होती. तरुण वयातच सामाजिक-राजकीय कारकीर्द सुरू केली. राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ते नेहमी झपाटून काम करत राहिले. एखाद्या राजहंसासारखं डौलदार व्यक्तिमत्व होतं त्यांचं.”
“आज अजितदादा आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. त्यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी राहील. परमेश्वर पवार कुटुंबाला आणि लाखो कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो,” अशी प्रार्थना पाटील यांनी केली.
