लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ ‘शक्तिस्थळ’चे भव्य लोकार्पण

👁️ 192 Views

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात एक भावनिक व अभिमानाचा क्षण नोंदवला जाणार आहे. प्रेरणा, निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतीक असलेले लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या ‘शक्तिस्थळ’ या प्रेरणा केंद्राचे भव्य लोकार्पण गुरुवार, दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता पिंपळे गुरव गावठाण येथील मारुती मंदिराजवळ होणार आहे.

आमदार शंकर जगताप याबाबत माहिती देताना म्हणाले, ‘‘लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाची ख्याती सर्वश्रुत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला अत्याधुनिक शहर बनवण्याचा त्यांचा ध्यास होता. नाविन्यपूर्ण गोष्टी शहरासाठी उपयोगात येतील यावरच त्यांचा नेहमी भर असायचा. लक्ष्मणभाऊंच्या कार्याचा वारसा आणि भावी पिढ्यांना दिशा देणारी प्रेरणा यांचा संगम साधत हे शक्तिस्थळ उभारण्यात आले आहे. हे शक्तिस्थळ केवळ स्मारक नसून, सेवाभाव, निष्ठा आणि कर्तव्याची जिवंत शिकवण ठरणार आहे. आयुष्यभर सर्वसामान्य माणसासाठी झटणाऱ्या भाऊंच्या विचारांना येथे कायमस्वरूपी जतन केले जाणार आहे.’’

लोकार्पण कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार माधुरीताई मिसाळ, राज्याचे मंत्री डॉ. प्रा. तानाजीराव सावंत, माजी आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विजयजी रेणुसे तसेच विजय पांडुरंग जगताप यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार आहे. लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.

‘शक्तिस्थळ’ची वैशिष्ट्ये

१५ गुंठे जागेवर उभारलेल्या या शक्तिस्थळात लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींचे जतन करण्यात आले आहे. त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार व सन्मानचिन्हे कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी संग्रहित केली आहेत. येथे ग्रंथालय, अभ्यासिका व ॲम्फी थिएटरचा समावेश आहे. अभ्यासिकेच्या माध्यमातून युवकांना यूपीएससी व एमपीएससीच्या अभ्यासासाठी मदत होईल. ठिकाणी चौथरा उभारून अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली असून, विविध प्रकारच्या वृक्षांची रोपेही लावली आहेत.