पुणे : पुणे महानगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेले काही उमेदवार अचानक शांत का झाले, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. निवडणूक सुरू असताना जोरदार सुरुवात करूनही काही प्रभागांत प्रचाराची धार बोथट झाल्याचे चित्र दिसत आहे.
सर्वपक्षीय उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवारांमध्येही ‘स्ट्रॉंग’ आणि ‘विक’ उमेदवारांची छाननी सुरू असल्याची चर्चा आहे. काही उमेदवार प्रचारात आघाडी घेत असतानाच, काही ठिकाणी त्यांना ‘मॅनेज’ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये राजकीय दबाव, अंतर्गत समझोते किंवा समीकरणांची जुळवाजुळव कारणीभूत आहे का, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.
विशेष म्हणजे काही प्रभागांत सुरुवातीला झंझावाती प्रचार, फलकबाजी, सभा आणि सोशल मीडियावरील आक्रमक पोस्ट्स दिसत होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांत या प्रचारात अचानक घट झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. सोशल मीडियावरील पोस्ट्स कमी होणे, कार्यकर्त्यांची हालचाल मंदावणे आणि प्रचार फेऱ्यांमध्ये घट होणे, यामुळे ‘उमेदवार माघार घेत आहेत का?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
महानगरपालिका निवडणूक ही पुण्याच्या विकासदिशेचा कणा मानली जाते. त्यामुळे अशा चर्चा केवळ राजकीय नाहीत, तर लोकशाही प्रक्रियेबाबतही प्रश्न निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. शेवटी, मतदारच या सर्व चर्चांना उत्तर देणार असून, मतदानाच्या दिवशी खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे.
