पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागातील सुतारदरा परिसरातील शिवकल्याण नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन मानकर यांनी पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेदरम्यान स्थानिक रहिवाशांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची प्रत्यक्ष नोंद घेतली गेली.
पदयात्रेनंतर पांडुरंग कॉलनी येथे आयोजित कोपरा सभेत परिसरातील विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच अन्य मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने मते मांडली. “लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवादच खऱ्या विकासाचा पाया असतो,” असे मत मानकर यांनी यावेळी व्यक्त केले.
गेल्या अनेक वर्षांत आदरणीय दीपकभाऊ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. या कामांमुळे परिसरातील जीवनमान उंचावल्याचे नागरिकांनीही मान्य केले. विकासाचा हा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन मानकर यांनी केले.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोपरा सभा आणि पदयात्रेमुळे प्रभागातील मतदारांमध्ये विकासाबाबत विश्वास निर्माण झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसून आले.
