पुण्यात शिवसेनेचा रणशिंगनाद; योगेश कदमांच्या प्रचार दौऱ्याने शहरात राजकीय लाट

👁️ 280 Views

पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने प्रचाराच्या रणांगणात जोरदार मुसंडी मारली आहे. गृहराज्यमंत्री योगेश रामदासभाई कदम यांच्या आजच्या पुणे दौऱ्याने शिवसेना–रिपब्लिकन सेना युतीच्या प्रचाराला नवी धार मिळाली असून, शिवसैनिकांचा उत्साह शिखरावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

जनतेशी थेट संवाद, रस्त्यावर उतरलेला प्रचार आणि विकासाचा ठाम अजेंडा यामुळे शिवसेनेचा प्रचार वेगाने पुढे जात असून, शहरातील विविध प्रभागांत भव्य पदयात्रा व जाहीर सभांनी वातावरण भारावून गेले आहे. या दौऱ्यात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती प्रचाराला बळ देणारी ठरत आहे.

सायंकाळी ६.३० वाजता , प्रभाग क्रमांक २ (फुलेनगर–नागपूरचाळ) येथे शिवसेना–रिपब्लिकन सेना युतीचे उमेदवार डॉ. रिंकू शैलेंद्र मोरे, ॲड. विजयकुमार भुजंगराव ढाकणे आणि विपुल राजेंद्र दळवी यांच्या प्रचारासाठी नागपूरचाळ ते हौसिंग बोर्ड, ईशान्य मॉल या मार्गावर भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा शक्तिप्रदर्शन ठरणार आहे.

त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता, प्रभाग क्रमांक ६ (येरवडा–गांधीनगर) येथे शिवसेनेचे उमेदवार किशोर चंद्रकांत वाघमारे, कोमल अभिजीत वाघचौरे, स्नेहल सुनील जाधव आणि आनंद रामनिवास गोयल** यांच्या प्रचारार्थ गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला डॉ. नीलम गोऱ्हे, माजी आमदार रवी धंगेकर, अजय भोसले तसेच युवासेना प्रदेश सचिव किरण साळी उपस्थित राहणार असून, विकास, सुरक्षा आणि लोकहिताचे मुद्दे ठळकपणे मांडले जाणार आहेत.

रात्री ८.३० वाजता , प्रभाग क्रमांक ३४ (नर्हे–वडगाव बु.–धायरी) येथे शिवसेना उमेदवार निलेश दशरथ गिरमे, राधिका दशरथ गिरमे, सुप्रिया ईश्वर भूमकर आणि विठ्ठल ज्ञानेश्वर तांबे यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील कालभैरव मंदिर चौक, नर्हे रोड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेलाही डॉ. नीलम गोऱ्हे, रवी धंगेकर आणि किरण साळी उपस्थित राहणार असून, नर्हे–धायरी परिसरात शिवसेनेची ताकद ठळकपणे अधोरेखित होणार आहे.

योगेश कदम यांच्या दौऱ्यामुळे शिवसेना–रिपब्लिकन सेना युतीच्या प्रचारात नवचैतन्य संचारले असून, पुणे महानगरपालिका निवडणुकीत ही युती निर्णायक भूमिका बजावेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.