धीरगंभीर नेतृत्वाचा आधारस्तंभ : कोथरूडचा अभिमान चंद्रकांतदादा पाटील

👁️ 762 Views

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात शांत, संयत आणि प्रभावी नेतृत्वाची ओळख असलेले चंद्रकांतदादा पाटील हे कोथरूड मतदारसंघाचे आमदार व राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचे नेतृत्व कोथरूडसाठी केवळ राजकीय प्रतिनिधित्व नसून, विश्वासाचा आणि भावनिक आधाराचा कणा ठरले आहे.

मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीतून उभारी घेतलेल्या चंद्रकांत दादांची जीवनयात्रा संघर्ष, चिकाटी आणि समर्पणाची साक्ष देणारी आहे. १० जून १९५९ रोजी जन्मलेले दादा पाटील यांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केले, तर फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून वाणिज्य पदवी संपादन केली. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश करून त्यांनी संघटनात्मक कार्याची मजबूत पायाभरणी केली.

एबीव्हीपीतील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्यानंतर २००४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला नवे वळण मिळाले. विधान परिषद सदस्य, मंत्रीपद आणि पालकमंत्री म्हणून त्यांनी सहकार, महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम व उच्च शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांत ठसा उमटवला. सध्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून राज्याच्या युवा पिढीच्या भवितव्याला दिशा देण्याचे कार्य ते करीत आहेत.

मितभाषी पण ठाम निर्णयक्षमतेचे व्यक्तिमत्त्व असलेले चंद्रकांतदादा पाटील हे कोथरूडच्या विकासाचे प्रतीक बनले आहेत. रस्ते, शिक्षण व आरोग्य सुविधांतील सुधारणा त्यांच्या कार्यकुशलतेची साक्ष देतात. संघर्षातून यशाकडे जाणारी ही वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.