पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर) मध्ये एक वेगळाच सूर उमटताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी यांना मिळणारा वाढता जनसमर्थनाचा ओघ आता केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो विश्वास आणि अपेक्षांचा भावनिक प्रवाह बनत आहे.
समाजसेविका आणि उद्योजिका म्हणून ओळख असलेल्या तलाठी यांनी निवडणूक रिंगणात उतरताच सुरुवातीला फारशी दखल घेतली गेली नव्हती. मात्र, थेट संवाद, प्रामाणिक भूमिका आणि प्रश्नांशी जोडलेली भाषा यामुळे अल्पावधीतच त्यांनी मतदारांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. प्रचार फेऱ्यांमध्ये महिला, युवक आणि मध्यमवर्गीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून, अनेक ठिकाणी प्रचार सभा संवादात्मक चर्चेत रूपांतरित होत आहेत.
‘आरंभ है प्रचंड’ या घोषवाक्याखाली सोशल मीडियावर सुरू असलेली त्यांची मोहीमही विशेष लक्ष वेधून घेत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि महिला सुरक्षेसारख्या रोजच्या प्रश्नांवर त्यांनी मांडलेली स्पष्ट भूमिका मतदारांना आपलीशी वाटत आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोथरूडमध्येही पक्षीय राजकारणाला कंटाळलेल्या नागरिकांचा ओढा अपक्ष पर्यायाकडे वळताना दिसतो आहे.
“मी पक्षासाठी नाही, तर माणसांसाठी उभी आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त करणाऱ्या अनिता तलाठी यांचा हा लढा आता आशेचा आणि बदलाचा प्रतीक बनत चालला आहे.
सुमारे ७० हजार मतदारसंख्या असलेल्या या प्रभागात महिलांचा निर्णायक वाटा लक्षात घेता, हा वाढता जनपाठिंबा आगामी निकालात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे चित्र स्पष्ट होत आहे.
