पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांसोबत थेट व सकारात्मक संवाद साधण्यात आला. डेक्कन जिमखाना, हॅपी कॉलनी संकुल सोसायटी, कर्वेनगर व एरंडवणे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, अपेक्षा आणि विकासाविषयीच्या भावना मोकळेपणाने मांडल्या.
या संवादात रस्त्यांची दुरवस्था, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, वाढती वाहतूक कोंडी, सार्वजनिक सुविधांचा अभाव यासह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रामाणिक मांडणीमुळे हा संवाद केवळ औपचारिक न राहता भावनिक नातं निर्माण करणारा ठरला. ‘आमच्या प्रश्नांना ऐकणारे नेतृत्व हवे’ अशी भावना यावेळी ठळकपणे व्यक्त झाली.
या वेळी प्रभाग क्रमांक २९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड. राहुल सुरेश लांडे, वैशाली अनिल भिलारे, गौरी संजय करंजकर व शुभम अंकुश मातळे उपस्थित होते. तसेच पर्वती विधानसभा कार्याध्यक्ष विपुल म्हैसूरकर व कसबा विधानसभा युवक अध्यक्ष गजानन लोंढे यांनी मार्गदर्शन केले.
नागरिकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रभाग २९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केला. हा संवाद विकासाच्या दिशेने विश्वासाचे नवे पाऊल ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
