पुणे:कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरातील स.नं.८४/१६५ या जागेवर राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच शिवसेनेचे नेते रोहित मारणे व मंगल सोनटक्के यांनी केला आहे. झोपडपट्टी धारकांच्या अंतिम पात्रता यादीत फेरफार करून अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे प्रामाणिक व पात्र झोपडीधारकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या १६ मे २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार १ सप्टेंबर २००० हा अर्हता दिनांक निश्चित आहे. मात्र, ७ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम पात्रता यादीत या निकषांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. संबंधित विकासक (बिल्डर) तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील काही अधिकारी यांच्या संगनमताने ही यादी तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणासंदर्भात आवश्यक कागदपत्रे व ठोस पुरावे उपलब्ध असल्याचा दावा शिवसेनेचे नेते रोहित मारणे यांच्याकडून करण्यात आला असून, संबंधित विकासकासह सर्व्हेक्षक, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्रमांक २ आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांची व शासनाची फसवणूक लक्षात घेऊनही कारवाई झाली नाही, तर स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शिवसेनेचे नेते रोहित मारणे व मंगल सोनटक्के यांच्याकडून करण्यात आली आहे.
