शिक्षकांचा वाढता पाठिंबा; कौस्तुभ गावडे यांचा विजयाचा विश्वास

👁️ 1498 Views

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना शिक्षकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण भागांतून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने करण्यात येत आहे.

शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार गावडे यांनी व्यक्त केला आहे. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करून त्यांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी ठोस पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘कोणावर टीका करण्यापेक्षा मी स्वतःच्या कामावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे. आपला विश्वास, हीच माझी ताकद,’ अशी भूमिका मांडत गावडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.

शिक्षकांच्या अडचणी सोडविणे, त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देणे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे, हा आपला मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विविध भागांतून मिळणारा प्रतिसाद आणि शिक्षकांशी सुरू असलेला संवाद यामुळे आपण विजयाबाबत आशावादी असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे. शिक्षकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी नमूद केले.