मुंबई : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि रोजगाराभिमुख कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग क्षेत्र आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

या बैठकीत DELL टेक्नॉलॉजी आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या ‘उडान (UdAAN)’ कार्यक्रमाच्या प्रतिनिधींसोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाच्या विविध संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला.
उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, तसेच त्यांची डिजिटल कौशल्ये, तंत्रज्ञानविषयक ज्ञान आणि रोजगारक्षमता वाढावी, यासाठी प्रशिक्षणाधारित उपक्रम राबविण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
या वेळी अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, DELL टेक्नॉलॉजीचे CSR प्रमुख प्रभात भट्टाचार्य आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनचे गणेश भागवत उपस्थित होते.
