पुणे : भारत-तिबेट सहयोग मंच, पश्चिम महाराष्ट्र प्रांताची व्यापक बैठक मोतीबाग संघ कार्यालय, पुणे येथे नुकतीच पार पडली. तिबेट मुक्ती अभियान, कैलास-मानसरोवर मुक्ती संकल्प अभियान तसेच तिबेटी बांधवांच्या हक्कांबाबत जनजागृती आणि संघटनात्मक कार्याच्या विस्तारासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष सुनील देवभानकर यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. आगामी श्रावण महिन्यात हिंदूंचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या कैलास पर्वत व मानसरोवर मुक्तीसाठी विविध शिवमंदिरांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मुक्ती संकल्प अभियानाची’ माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विनीत गाडगीळ यांनी तिबेट मुक्ती अभियान तसेच तिबेटी बांधवांच्या हक्कांबाबतची जनजागृती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रांतातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. प्रांतस्तरावर संघटनात्मक विस्तार करताना विविध स्तरांवर सक्षम कार्यकर्त्यांची रचना उभी करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांसाठी बौद्धिक प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
पश्चिम क्षेत्र संयोजक मोहन बागमार यांनी आगामी तवांग यात्रेची सविस्तर माहिती देत जनसंपर्क व भेटीगाठींची रूपरेषा मांडली. अधिकाधिक नागरिकांनी तवांग तीर्थयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंचाच्या प्रचार-प्रसिद्धी विभागाचे सुशील कुलकर्णी यांनी प्रभावी सोशल मीडिया माध्यमातून भारत-तिबेट सहयोग मंचाचे कार्य आणि तिबेट प्रश्नाबाबतची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम व सोशल मीडिया योजनांचे सादरीकरण केले.
बैठकीचा समारोप युवा विभागाचे महामंत्री चेतन शर्मा यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
