बस पार्किंगसाठी जागेची गरज; ‘आपले पुणे – आपला परिसर’च्या पदाधिकाऱ्यांची CMD महेश आहवाड यांच्याकडे मागणी
पुणे : दांडेकर पुलाजवळ PMPMLसाठी आरक्षित असलेल्या मोक्याच्या जागेचा ताबा महामंडळाने स्वतःकडे घ्यावा, तसेच या जागेच्या विकासासाठी पूर्वी देण्यात आलेली ना-हरकत प्रमाणपत्राची (NOC) परवानगी रद्द करावी, अशी मागणी ‘आपले पुणे – आपला परिसर’च्या पदाधिकाऱ्यांनी PMPMLचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महेश आहवाड यांच्याकडे केली आहे.
दांडेकर पुलाजवळील सर्व्हे क्रमांक 583 आणि 585 (PMPML 3 व 4) येथील जागा PMPMLसाठी आरक्षित आहे. या जागेचा विकास करण्यासाठी पूर्वीच्या प्रशासनाकडून बिल्डरला NOC देण्यात आली होती. मात्र, सध्या PMPMLला बसेस उभ्या करण्यासाठी जागेची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. त्यामुळे आरक्षित जागेचा वापर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या हितासाठी करावा, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.

बांधकाम नसल्याने NOC रद्द करण्याची मागणी
संबंधित जागेसाठी NOC देण्यात आली असली, तरी अद्याप बांधकामाचे नकाशे मंजूर झालेले नाहीत आणि जागेवर कोणतेही बांधकामही झालेले नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वीची NOC रद्द करून जागा PMPMLच्या ताब्यात घ्यावी आणि भविष्यात बस पार्किंगसह महामंडळाच्या आवश्यक कामांसाठी तिचा उपयोग करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनासोबत जागेचा नकाशाही जोडण्यात आला आहे.
या निवेदनावर माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे आणि माजी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत महापालिका आयुक्तांनाही देण्यात आली आहे.
