Headlines

वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठुरायाची सेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

👁️ 193 Views
पुणे : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने आयोजित ‘श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरण सेवा’ उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असून अशा सेवाकार्यात सहभागी होणे हे मोठे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन या सेवाकार्यात सहभागी होत असल्याचा विशेष आनंद आहे. वारीत सहभागी होणारे लाखो वारकरी दीर्घ पायी प्रवास करून येथे येतात. त्यांचा शारीरिक थकवा दूर करण्यासाठी राबविण्यात येणारा ‘चरण सेवा’ उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.’’
वारकरी संप्रदायात प्रत्येकामध्ये माऊलीचे दर्शन घेतले जाते. एकमेकांच्या चरणी नम्रतेने वंदन करण्याची परंपरा समता, भक्ती आणि सेवाभावाचा संदेश देणारी आहे. अशा वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळणे हे मोठे भाग्य असून, विठुरायाच्या भक्तांची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या तरुण स्वयंसेवकांच्या समर्पित सेवाभावाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तसेच या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते आणि आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले. विशेषतः आमदार सुनील कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. ग्रामविकास विभागामार्फत आधुनिक पद्धतीची चरण सेवा यंत्रे उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे वारकऱ्यांना अधिक दर्जेदार सुविधा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गेल्या काही वर्षांत आषाढी वारीच्या व्यवस्थापनात अनेक सकारात्मक बदल करण्यात आल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, वारकऱ्यांसाठी जर्मन हँगर, ‘निर्मल वारी’ अभियान, प्रशस्त पालखी मार्ग अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील दोन ते तीन वर्षांत पंढरपूर कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून, काशी, अयोध्या आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.