पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर) मध्ये अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी यांना मिळणारा जनपाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. समाजसेविका व उद्योजिका म्हणून परिचित असलेल्या तलाठी यांनी उभारलेली निवडणूक मोहीम आता केवळ प्रचार न राहता जनआंदोलनाचे स्वरूप घेत आहे.
अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुरुवातीला दुर्लक्षित राहिलेल्या तलाठी यांनी अल्पावधीतच मतदारांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. महिला, युवक आणि मध्यमवर्गीय नागरिकांचा वाढता सहभाग त्यांच्या प्रचार सभांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. सोशल मीडियावर ‘आरंभ है प्रचंड’ या प्रभावी घोषवाक्याखाली सुरू असलेल्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांचे विचार आणि कार्य हजारो नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत.
“कार्य, कर्म आणि संवाद” या तत्त्वांवर आधारित प्रचारातून तलाठी यांनी रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि महिला सुरक्षेसारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली आहे. कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी पक्षीय राजकारणाला कंटाळलेल्या मतदारांचा ओढा अपक्ष पर्यायाकडे वळताना दिसतो आहे.
“मी कोणत्याही पक्षासाठी नाही, तर केवळ जनतेसाठी उभी आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त करत तलाठी यांनी सेवा आणि प्रामाणिकपणालाच आपली खरी ताकद मानली आहे. सुमारे ७० हजार मतदारसंख्या असलेल्या या प्रभागात महिला मतदारांचे प्राबल्य असून, आगामी निकालात हा जनपाठिंबा निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
