पुणे: अवकाळी पावसामुळे कर्वे रोड परिसरात झालेल्या जलसंचयामुळे कोथरूडमधील डीपी रोडवरील ओढ्यावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे पुणे महानगरपालिकेचे लक्ष वेधले गेले आहे. प्रभाग ३१ मधील या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू असल्याचे समोर आले आहे.
शिवसेना नेते रोहित मारणे यांनी स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेचे भेलके यांच्यासोबत महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. यापूर्वी मारणे यांनी या अनधिकृत बांधकामाविरोधात आंदोलन करत महापालिकेला इशारा दिला होता.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी निवेदन स्वीकारताना पुढील ४८ तासांत पाहणी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावर प्रतिक्रिया देताना रोहित मारणे म्हणाले, “४८ तासांनंतरही पाहणी व कारवाई झाली नाही तर सर्वपक्षीय मोठे आंदोलन उभारण्यात येईल.”

नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह अडवून डीपी रोडचे काम सुरू असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकारामुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे मारणे यांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाने या अनधिकृत बांधकामावर तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. या प्रकरणी पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
