पुणे :पत्रकारिता आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम साधणारा एक तरुण आज महाराष्ट्रात प्रेरणादायी उदाहरण बनला आहे. स्वतःच्या वार्षिक उत्पन्नातील तब्बल २० टक्के रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणारे समाधान भागवत काटे गेल्या दहा वर्षांपासून आरोग्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, कला आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देत आहेत. त्यांनी ‘कर्तव्यदक्ष आणि समाजभान जपणारा पत्रकार’ अशी ओळख निर्माण केली आहे.
सध्या पुण्यातील नामांकित मराठी दैनिक ‘सकाळ’मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत असलेले समाधान काटे यांनी लहानपणापासूनच समाजसेवेची आवड जोपासली. २०१६ मध्ये त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था’ स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून ते आरोग्य शिबिरे, शिक्षण सहाय्य, स्वच्छता अभियान आणि आपत्ती काळातील मदतकार्य यांसारखे प्रभावी उपक्रम राबवत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांची सुरुवात करणाऱ्या काटे यांनी आज पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत संस्थेच्या वतीने कार्य केले आहे. सोलापूर येथील स्थानिक वृत्तपत्रात बातमीदार ते व्यवस्थापक म्हणून तीन वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजमधून मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन ही पदवी प्राप्त केली.
२०११ पासून माध्यम क्षेत्रात सक्रिय असलेले काटे आरोग्य, शिक्षण, गुन्हेगारी, राजकारण आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रभावी व संतुलित वार्तांकन करतात. संस्थेचे ब्रीदवाक्य ‘समाजकार्यातून राष्ट्रप्रगती’ हे ते प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.

काटे यांचे कार्य केवळ बातमीदारकीपुरते मर्यादित नाही, तर ते समाजाला दिशा देणारे आणि माणुसकी जपणारे आहे. अशा समर्पित व्यक्तिमत्त्वांना साथ देणे म्हणजे उज्ज्वल समाजनिर्मितीला हातभार लावणे होय. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे हाच त्यांच्या प्रयत्नांचा खरा गौरव ठरेल.
“पत्रकारिता करत असताना सामाजिक भान जपणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदतीचा हात द्यावा. केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणे गरजेचे आहे. आपली छोटीशी मदतही एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते.”
समाधान भागवत काटे
संस्थापक व अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था
निवडक सामाजिक उपक्रम
– विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्य वाटप
– मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे
– स्वच्छता अभियान व आपत्ती व्यवस्थापन उपक्रम
– उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान
– विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शिवसंस्कार शिबीर’
– रक्तदान शिबिरे
– वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
