पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही केवळ शहरी केंद्रे नसून, कष्टकरी, कामगार आणि विविध समाजघटकांना सामावून घेणारी ‘मिनी भारत’ आहेत. मराठवाड्यातील हजारो कुटुंबांनी रोजगाराच्या शोधात येथे येत या शहरांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित मराठवाड्यातील मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. १९९१ पासून या शहरांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगत पवार म्हणाले, “पिंपरी-चिंचवडचा चेहरा-मोहरा बदलण्यामागे कामाची शिस्त आणि शब्दाला जागण्याची भूमिका आहे. जिथे अन्याय होतो, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहते.”
मराठवाड्याची भूमी संतांची, कष्टकरी आणि धैर्यवान लोकांची असल्याचे नमूद करत त्यांनी बीड जिल्ह्याने दिलेल्या प्रेमाची परतफेड विकासकामांतून केल्याचे सांगितले. बीड–अहिल्यानगर रेल्वेमार्ग, सीआयआयआयटी, सायन्स पार्कसह कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची भूमिपूजने ही केवळ घोषणा नसून प्रत्यक्ष कृती असल्याचा त्यांनी दावा केला.
मात्र, सध्याच्या कारभारामुळे स्वच्छतेचा अभाव, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि नियोजनशून्यता वाढल्याची टीका करत पवार म्हणाले, “आता परिवर्तन अटळ आहे. प्रामाणिक व कार्यक्षम नेतृत्वालाच संधी द्यावी लागेल.”
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी सक्षम उमेदवार दिले असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना निर्भय राहण्याचे, जातीय सलोखा जपण्याचे आवाहन केले. पुणे-पिंपरी-चिंचवडच्या उज्ज्वल भविष्यासाठी घड्याळ व तुतारी चिन्हासमोरील बटण दाबून विकासाला साथ द्या, असा संदेश त्यांनी दिला.
