Headlines

मोहोळला सोलापूरपासून तोडू नका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजन घाडगे, रामलिंग महामुनी यांची मागणी

👁️ 415 Views

मोहोळ : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, पंढरपूर यांच्या कार्यक्षेत्रात मोहोळ तालुक्याचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला हरकत घेत, मोहोळ तालुका पूर्वीप्रमाणेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रात कायम ठेवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजन घाडगे आणि रामलिंग महामुनी यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारयांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात मोहोळ तालुक्याची भौगोलिक रचना, प्रशासकीय सोयी, नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामकाजासाठी सोलापूरवरील अवलंबित्व तसेच महसूल, न्यायालयीन आणि इतर शासकीय कार्यालये सोलापूर येथेच असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कार्यक्षेत्रात बदल झाल्यास नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भार, वेळेचा अपव्यय आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मोहोळ शहराची भौगोलिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी विनंतीही घाडगे आणि महामुनी यांनी केली. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना विषयाचा सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करून योग्य निर्णय घेण्याबाबत सूचना केल्याची माहिती निवेदनकर्त्यांनी दिली.

दरम्यान, मोहोळ तालुक्याच्या प्रशासकीय हिताशी संबंधित या मागणीमुळे नागरिकांमध्ये अपेक्षेचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाच्या अंतिम निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.