पिंपरी चिंचवड :पिंपळे निलख, वाकड, कस्पटे वस्ती आणि विशाल नगर या भागांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २६ च्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) कडून प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला. पक्षाचे अधिकृत उमेदवार तुषार कामठे यांच्या प्रचाराला मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील आण्णा शेळके आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दणक्यात सुरुवात झाली.पदयात्रेच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
तुषार कामठे यांच्या पॅनेलमध्ये सहउमेदवार म्हणून संकेत शामराव जगताप, सौ. सारिका गणेश कस्पटे आणि सौ. सीमा शिरीष साठे यांचा समावेश आहे. प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य सुविधा सक्षम करणे, हा आपल्या प्रचाराचा केंद्रबिंदू असल्याचे कामटे यांनी सांगितले. “नागरिकांचा विश्वास आणि सहभाग हाच आमचा खरा भांडवल आहे. या निवडणुकीतून प्रभागाला नवे बळ मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन करत, शरदचंद्र पवारांच्या विचारधारेतून विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे यांनीही पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग पाहून समाधान व्यक्त केले.
या पदयात्रेत महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय ठरला. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रचाराच्या या शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक २६ मधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, येत्या दिवसांत ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
