पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली असून, प्रचाराचा भव्य शुभारंभ ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. जैन मंदिरात दर्शन घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला मंगल सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्कमध्ये शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला.
यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे, शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, अजय भोसले, आबा बागुल, युवा नेते किरण साळी, रमेश कोंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले,“ही निवडणूक शिवशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. शिवसेनेने नेहमीच धनशक्तीला पराभूत केले आहे. पुण्यात १२० हून अधिक जागांवर शिवसेना लढत असून, निकालानंतर महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरेल.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या प्रश्नांवर ठोस काम केले असून, पुणेकर शिवसेनेला साथ देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “लाडकी बहीण योजनेवर झालेला अपप्रचार जनतेने फेटाळला आहे. शिवसेनेच्या मागण्या सन्मानजनक होत्या. प्रचारात सकारात्मक भूमिका ठेवा, विरोधकांवर अनावश्यक टीका टाळा.” शिवसेनेकडून ११९ उमेदवार देण्यात आले असून, महिलांना सर्वाधिक संधी देणारा पक्ष शिवसेना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्तेत आल्यास पीएमपीएमध्ये महिलांना अर्धे तिकीट, प्रत्येक प्रभागात ‘आपला दवाखाना’, अपघात व कोंडीमुक्त पुणे आणि मंदिरांचे संरक्षण करण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रचाराच्या या शुभारंभामुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
