पुणे :कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्थापित उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवारांचा जोर वाढताना दिसत आहे. अपक्ष उमेदवार अनिता विवेक तलाठी यांना स्थानिक नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत असून, निवडणूक लढतीला चुरशीचे वळण मिळाले आहे.
ज्येष्ठ नेते मिलिंद एकबोटे यांनी आज तलाठी यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत प्रभागातील विविध भागांत भेटी देत प्रचार केला. त्यांच्या उपस्थितीमुळे तलाठी यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे चित्र आहे.
प्रचारादरम्यान बोलताना एकबोटे म्हणाले,“ही निवडणूक केवळ राजकीय समीकरणांची नसून, प्रभागाच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची आहे. अनिता तलाठी यांनी सातत्याने स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले असून, जनतेने त्यांना पाठबळ द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी कार्यकर्त्यांनी “प्रभाग ११ च्या विकासासाठी – फक्त अनिता विवेक तलाठी” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
प्रभाग ११ मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि हिरवळीचे संवर्धन हे प्रमुख निवडणूक मुद्दे ठरत आहेत. तलाठी यांनी घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक वर्गात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एका स्थानिक नागरिकाने सांगितले, “पक्षीय राजकारणापेक्षा काम करणारा उमेदवार आम्हाला हवा आहे. अनिता ताईंचे काम प्रत्यक्षात दिसते,”असे मत व्यक्त केले.
या प्रभागात एकाहून एक असे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, अपक्ष उमेदवार म्हणून अनिता तलाठी यांनी मतदारांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करत प्रचार सुरू असून, १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

व्हेरी गुड*****