पुणे :राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या धडाकेबाज रोडशोने पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. नारायण पेठ, सदाशिव पेठ आणि शनिवार पेठच्या काही भागांतून काढण्यात आलेल्या या रोडशोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रस्त्यांच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात अजितदादांचे स्वागत केले. या दृश्यामुळे प्रभागात जणू निवडणुकीचा शंखनादच झाला.
रोडशोदरम्यान अजित पवार यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा विश्वास दिला. “पुण्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा निर्धार आहे,” असे सांगत त्यांनी मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या उपस्थितीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले.
या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ॲड. रूपाली ठोंबरे पाटील, ॲड. राधिका कुलकर्णी आणि सुनील खापटे हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तिघेही विकास, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि नागरी सुविधांवर लक्ष केंद्रित करत आक्रमक प्रचार करत आहेत.
विशेष लक्ष वेधून घेत आहेत ॲड. राधिका कुलकर्णी या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांच्या साध्या-सोप्या भाषणशैलीने आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी जोडलेल्या भूमिकेने त्या मतदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. “मी सामान्य कुटुंबातील आहे; तुमच्या अडचणी माझ्याच आहेत,” या शब्दांनी अनेक मतदारांच्या मनाला भावनिक स्पर्श केला.
प्रभाग क्रमांक २५ मध्ये यंदा हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. विरोधकांकडूनही जोरदार तयारी सुरू असून, विकास हाच केंद्रबिंदू ठरत आहे. १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी निकाल लागणार असल्याने पुणेकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यंदाची पुणे महानगरपालिका निवडणूक युवक व महिला उमेदवारांच्या वाढत्या सहभागामुळे अधिक चुरशीची ठरत आहे. अजित पवार यांच्या रोडशोने मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, शहराच्या भवितव्याची दिशा ठरवणारी ही निवडणूक ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. विकासाच्या नव्या पहाटेच्या अपेक्षेने प्रभागातील रहिवासी आशेने वाट पाहत आहेत.
