पुणे:पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांनी कसबा व सूस परिसरात भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो पुणेकरांच्या सहभागातून शहराच्या विकासाची आस आणि बदलाची अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त झाली.
रोहित पवार यांनी भावनिक आणि ठाम शब्दांत नागरिकांना आवाहन केले. ते म्हणाले, “स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त पुणे घडवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना विजयी करा. ही निवडणूक केवळ सत्ता बदलाची नाही, तर पुण्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीची चळवळ आहे.”
पदयात्रेदरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला. वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि नागरी सुविधांची कमतरता या प्रश्नांकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक व शैक्षणिक वैभव आहे. एकजूट आणि योग्य नियोजन असेल, तर हे शहर देशातील आदर्श महानगर बनू शकते.”
या पदयात्रेत महिला व युवकांचा मोठा सहभाग दिसून आला. पर्यावरण संरक्षण, महिला सुरक्षा आणि आधुनिक पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ही पदयात्रा प्रचारापेक्षा पुणेकरांच्या भावना आणि अपेक्षांना स्पर्श करणारी ठरली असून, निवडणुकीच्या रणांगणात नवे वारे वाहू लागल्याचे चित्र आहे.
