समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव : भैय्याजी जोशी

👁️ 622 Views

डीईएस पुणे विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे भव्य उद्घाटन

पुणे : शिक्षण प्रक्रियेत माहिती आणि बुद्धिमत्तेची समृद्धी दिसून येत असली तरी ज्ञानकेंद्रित दृष्टिकोनाच्या अभावामुळे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया अवरुद्ध झाली आहे. यासाठी शिक्षणाच्या सर्व स्तरांवर पुनर्मूल्यांकन अपरिहार्य आहे, असे सखोल मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

डीईएस पुणे विद्यापीठाच्या शिक्षण विद्याशाखेच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये आयोजित या कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (डीईएस) अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, सचिव डॉ. आनंद काटीकर, कुलगुरू डॉ. राजेश इंगळे आणि विद्याशाखा प्रमुख डॉ. जयंत कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

भैय्याजी जोशी म्हणाले, “शिक्षण केवळ माहिती प्रदान करणारे नसावे, तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीला प्रोत्साहन देणारे असावे. बाह्य व्यक्तिमत्त्व विकसित करणे सहजसाध्य असते; मात्र आंतरिक व्यक्तित्व घडविणे हे आव्हानपूर्ण आहे. हे पुस्तकी शिक्षणाने साध्य होत नाही. शिक्षण सम्यक, संतुलित आणि समन्वित असणे आवश्यक आहे. सर्वांनी एकत्रितपणे व्यक्तित्व विकासाच्या दिशेने प्रयत्न करावेत.” त्यांनी सज्जन शक्तीच्या व्यावहारिक अभिव्यक्तीची गरजही अधोरेखित केली.

डॉ. रवींद्र आचार्य यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठाच्या समाजाभिमुख दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. “मनुष्यनिर्मितीच्या प्रक्रियेत आदर्श शिक्षक घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या विद्याशाखेतून साकार होईल,” असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यापीठाच्या अभिनव उपक्रमांची माहिती दिली.

डॉ. जयंत कुलकर्णी यांनी विद्याशाखेच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. ते म्हणाले, “राष्ट्र आणि समाजनिर्मितीसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित शिक्षक या विद्याशाखेतून तयार होतील. येथे स्थापन होणारे ‘सम्यक केंद्र’ सामाजिक समस्या अभ्यास, प्रशिक्षण, जनजागृती, धोरणनिर्मिती आणि शिक्षक विकासासाठी कार्यान्वित होईल.” ॲड. अशोक पलांडे यांनी आभार प्रदर्शन केले.