कोथरूडमध्ये अवैध बांधकामांचा विळखा; युवासेना नेते रोहित मारणे ॲक्शन मोडवर

👁️ 101 Views

पुणे : पुण्याच्या कोथरूड परिसरात अवैध बांधकामांचा सुळसुळाट होत असल्याचे गंभीर वास्तव समोर येत असून, याविरोधात युवासेना रोहित मारणे आक्रमक भूमिकेत उतरले आहेत. नामांकित बिल्डरांनी बनावट कागदपत्रे व नियमांना बगल देत बेकायदा इमारती उभारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे परिसराचा नियोजित विकास धोक्यात आला असून पर्यावरणीय संतुलनावरही विपरीत परिणाम होत असल्याचे मारणे यांनी स्पष्ट केले.

कोथरूड हा पुण्यातील वेगाने विकसित होणारा परिसर असला, तरी अलीकडील काळात येथे अतिक्रमणे, वाढते प्रदूषण आणि बेकायदा बांधकामांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका व संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे. काही बिल्डर आणि स्थानिक प्रशासनातील घटकांमध्ये संगनमत असल्याचा संशयही मारणे यांनी व्यक्त केला.

“सार्वजनिक हितासाठी आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, या प्रकरणाची महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून, चौकशी व कारवाईच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत आहेत.

शिवसेनेचे रोहित मारणे माध्यमांशी बोलताना...
शिवसेनेचे रोहित मारणे माध्यमांशी बोलताना…

अवैध बांधकामांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित मारणे यांच्या वाढत्या दबावामुळे येत्या काळात कारवाईला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.