जनमत नेमके कोणाकडे? महानगरपालिका निवडणुकांत सर्वसामान्यांपासून तज्ज्ञांपर्यंत संभ्रम

👁️ 494 Views

पुणे : मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील तब्बल एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असले, तरी नेमके जनमत कोणाच्या बाजूने आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. भाजप, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशा प्रमुख पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली असली, तरी मतदारांचा कल स्पष्टपणे कुणाकडे झुकतो आहे, याचा ठोस अंदाज बांधणे अवघड ठरत आहे.

विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यात गेली वीस वर्षे व त्याहून अधिक काळ पत्रकारिता करणारे अनुभवी पत्रकारही “यावेळी जनमत कुणाच्या बाजूने जाईल, हे सांगणे कठीण आहे,” असे स्पष्टपणे मान्य करत आहेत. राजकीय चर्चांमध्ये, यूट्यूब चॅनलवरील गप्पांमध्ये किंवा विश्लेषणात्मक कार्यक्रमांमध्ये व्यक्त होणारी मते आणि प्रत्यक्ष मैदानात दिसणारी परिस्थिती यामध्ये मोठी तफावत जाणवत आहे.

एका बाजूला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचार, चर्चा आणि दावे सुरू आहेत; तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य मतदार मात्र स्थानिक प्रश्न, उमेदवारांची कामगिरी आणि विश्वासार्हता यांचा विचार करून निर्णय घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे “ऑनलाइन आवाज” आणि “मतपेटीतील कौल” यात फरक राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक पातळीवरील पाणी, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, आरोग्य आणि महागाई यांसारखे प्रश्न मतदारांसाठी अधिक महत्त्वाचे ठरत असून, पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्ती आणि कामाचा ठसा निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदाच्या महानगरपालिका निवडणुकांत निकाल शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित राहतील, अशी भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.